माय नगर वेब टीम
पुणे : काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले कांद्याचे भाव आता उतरले आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात २० ते २५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे वाहतूक, उत्पादन खर्च निघून नफा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
सध्या कांदा निर्यातीसाठी २० टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने लावले आहे. वाढलेल्या आवकच्या पार्श्वभूमीवर हे निर्यात शुल्क हटविण्याच्या मागणीने जोर धरला आहे. निर्यात वाढल्यास कांद्याचे भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे निर्यात शुल्क हटविण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील कालावधीत कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे भाव वाढले होते. घाऊक बाजारातच कांद्याला ६० रुपये किलो भाव होता. अफगाणिस्तानसह इतर देशांतून कांद्याची आवक झाली होती, तर त्या वेळी कांदा निर्यात होऊ नये, यासाठी ४० टक्के निर्यात शुल्क लावले होते. त्यातील २० टक्के निर्यात शुल्क विधानसभा निवडणूकीपूर्वी हटविण्यात आले होते. २० टक्के निर्यात शुल्क कायम आहे.
मात्र, आता नवीन हळव्या कांद्याचे पीक आले आहे. विविध राज्यात कांद्याचे उत्पादन झाले आहे. येथील मार्केट यार्डात नेहमीच्या तुलनेत जास्त आवक होत आहे. मंगळवारी (दि. २४) जवळपास १२५ ते १३० ट्रक आवक झाली. या पार्श्वभूमीवर निर्यात शुल्क पूर्णपणे हटविण्याची मागणी होत आहे.
Post a Comment