Eknath Shinde : 'बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून...'; एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ



माय नगर वेब टीम 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांचा ११ दिवसांनी खातेवाटपाचा पेच सुटला. त्यानंतर आज बुधवारी ५ डिसेंबर रोजी शपथविधीचा मुहूर्त ठरला. या शपथविधीच्या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना वंदन करून शपथ घेतली. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे हे राज्यात उममुख्यमंत्री म्हणून भूमिका पार पाडतील.


मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला होता. शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा लावून धरला होता. मुख्यमंत्रिपद मिळण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मंदिरात प्रार्थना देखील केली. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत ताणतणाव पाहायला मिळाला. त्यात काही दिवस एकनाथ शिंदे आजारी देखील होते. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, ही बाब गुलदस्त्यात होती. त्यानंतर काही दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याचे जाहीर केले.


मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपद मिळावे, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत चर्चा सुरु होती. मात्र, भाजपचा गृहमंत्रिपदावर दावा कायम होता. त्यामुळे महायुतीतील खातेवाटप गुलदस्त्यात आहे. मात्र, महायुतीमधील तिन्ही प्रमुख नेत्यांनी शपथ घेतली आहे.


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांना कोणतं मंत्रिपद पडतंय, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील आजच होणार आहे.


आजच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरचा बायो बदलण्यात आला आहे. या ट्विटरच्या बायोमध्ये उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणारे दुसरे नेते ठरले आहेत. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्री स्वीकारलं होतं. आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post