माय नगर वेब टीम
मुंबई – राज्यातील विविध भागांमध्ये २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात वादळी पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील काही भागांत पावसाची शक्यता आहे. २७ डिसेंबरला खांदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध भागांमध्ये पावसाच्या शक्यतेसह वादळी वा-यांची परिस्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. २८ डिसेंबरला खांदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये दि. २७ रोजी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. या भागातील शेतक-यांनी यापुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रिय पट्टा तयार झाला आहे आणि अरबी समुद्रात आर्द्रता वाढली आहे. यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वा-यांसह पावसाची शक्यता आहे. याबरोबरच, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. कडाक्याची थंडी कमी झाली असून, पुढील काही दिवसांत किमान तापमानात २-४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाची सांगता वादळी पावसाने होणार असल्याचे हवामान खात्याच्या अंदाजावरून दिसत आहे.
Post a Comment