माय नगर वेब टीम
मुंबई – दक्षिण भारतातील काही राज्ये फेंगल चक्रीवादळामुळे प्रभावीत झाली असून चक्रीवादळ आता अरबी समुद्रावर घोंगावत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील थंडीची लाट ओसरली असून सहा ते सात जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा कर्नाटक समु्द्र सपाटी व पुर्वमध्य अरबीसमुद्रालगत स्थीर आहे.
महाराष्ट्रातील चारही विभागाचा अंदाज पाहता कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील सहा दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील. तसेच पाच ते सात डिसेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
कोकण गोव्यात रत्नागिरीत पाच तारखेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान तीस ते चाळीस किमी ताशी वेगाने वारे वाहतील. राज्यात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात फारसा बदल होणार नाही पण नंतर दोन ते चार डिग्री सेंटीग्रेडने तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात थंडीचा प्रभाव –
उत्तर भारतात थंडीचा प्रभाव दिसू लागला आहे. दाट धुक्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. दरम्यान, 15 डिसेंबरनंतर तापमानात आणखी घट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दिल्लीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास येथे अजूनही हवामान कोरडे आहे. या आठवड्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही. स्कायवेदरच्या मते, डिसेंबरच्या अखेरीस पावसाची शक्यता आहे. कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 7-8 डिसेंबर रोजी दिसून येईल, त्यामुळे ढग असू शकतात, परंतु पाऊस अपेक्षित नाही.
Post a Comment