नगरमध्ये किराणा मालासह विविध साहित्याच्या गोडावूनला भीषण आग

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर - शहरातील बुरूडगाव रोडवरील नक्षत्र लॉंन शेजारी असलेल्या किराणा माल व कॉस्मेटिक मटेरीयलच्या गोडावूनला मंगळवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली, या आगीत सुमारे सव्वा कोटी पेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, या गोडावून मध्ये सर्व साहित्यासह २ मालवाहतूक टेम्पो तसेच सुमारे ३.५ लाख ते ४ लाखांची रोकडही जाळून खाक झाली आहे.

बुरूडगाव रोडवर नक्षत्र लॉंन शेजारी आनंद शिंगी व सचिन शिंगी यांच्या मालकीचे एस एस मार्केटिंग या फर्मचे गोडावून आहे. शिंगी बंधूंकडे ८ ते १० कंपन्यांच्या मालाच्या एजन्सी असून या ठिकाणाहून ते संपूर्ण जिल्हा भरात किराणा दुकानांना या मालाचा पुरवठा करतात. मंगळवारी (दि.३) रात्री शिंगी बंधू व गोडावून मध्ये काम करणारे कामगार हे गोडावून बंद करून घरी गेल्यानंतर रात्री १२ च्या सुमारास गोडावूनला अचानक मोठी आग लागली.

गोडावून मधील बहुतांश साहित्य हे प्लास्टिकच्या आवरणात असल्याने आग काही वेळातच प्रचंड भडकली. परिसरातील नागरिकांनी शिंगी बंधूंना तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाला फोन करून आगीची माहिती दिली. अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पाण्याचा मारा सुरु करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग सारखी भडकत होती. त्यामुळे एमआयडीसीच्या अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. आग आटोक्यात येत नसल्याने गोडावून च्या पाठीमागील बाजूचे पत्रे जे.सी.बी. च्या सहाय्याने तोडून पाण्याचा मारा करण्यासाठी मार्ग काढावा लागला. दोन्ही दलांनी पहाटे पर्यंत सुमारे १३ ते १४ बंब पाण्याचा मारा करत पहाटे पर्यंत आग आटोक्यात आणली.

आगीने एवढे रौद्र रूप धारण केले होते की या आगीत सर्व काही जळून भस्मसात झाले आहे. त्यात सुमारे ३.५ लाख ते ४ लाखांची रोकड, मालाने भरलेले अशोक लेंलॅड (क्र. एम एच १६ सी सी ८५ ८४) टाटा एस टेम्पो (क्र. एम एच १६ सी सी ६२५७) ही दोन्ही वाहने, गोडावून मधील सर्व माल, टेबल, संगणक, प्रिंटर असे सुमारे १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे एस एस मार्केटिंगचे संचालक आनंद शिंगी यांनी सांगितले.

आग विझवण्यासाठी महापालिकेच्या माळीवाडा विभागाचे वाहन चालक सी.आर भांगरे, फायरमन पांडुरंग झिने, शुभम साठे, राहुल रोकडे, अमोल कुऱ्हाडे, एस. मिसाळ, सावेडी विभागाचे वाहनचालक सिकंदर वाकरे, फायरमन दिनेश शिंदे, अक्षय आव्हाड, अक्षय घुले    आदींनी २ बंब व एमआयडीसीचे फायरमन नितीन जाधव, गणेश कदम, बालाजी ओव्हाळ, चालक प्रकाश शिंगाडे व महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचे प्रशिक्षणार्थी यांनी प्रयत्न केले. पहाटे आग आटोक्यात आली तरी बुधवारी (दि.४) दुपारपर्यंत ती धुमसत होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post