माय नगर वेब टीम -
पुष्पा २ हा चित्रपट रिलीज झाला, मात्र प्रीमियरच्याच दिवशी बहुप्रतीक्षित चित्रपटाला गालबोट लागलं. ज्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईसह देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र ४ डिसेंबरला प्रीमियरच्या दिवशी चित्रपटगृहात चेंगराचेगरीत महिलेचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील थिएटरमध्ये एक धक्कादयक प्रकार घडला. वांद्रे येथील गॅलेक्सी थिएटरमध्ये चित्रपट पाहता पाहता प्रेक्षकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ लागली. त्यामुळे पुष्पा २ स्क्रिनिंग मध्येच बंद करावी लागली.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा २ पाहण्यासाठी मुंबईच नाही तर, देशभरातील प्रेक्षक थिएटरच्या बाहेर लांबलचक रांगा पाहायला मिळत आहे. सर्व थिएटर हाऊसफुल्ल झालेत. मात्र वांद्र्याच्या गॅटी गॅलेक्सीमध्ये प्रेक्षकांसोबत अजब प्रकार घडला. संपुर्ण थिएटर धुराने भरला. प्रेक्षकांचा श्वास कोंडला. पण हा धूर नेमका कुठून आणि कोणता होता?
थिएटरमध्ये विषारी धुराची फवारणी
वांद्रे येथील थिएटरचा व्हीडीओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये इंटरव्हलनंतर सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवण्यात आलं. थिएटरमध्ये कुणीतरी विषारी धुराची फवारणी केली. या धुरामुळे प्रेक्षकांचा श्वास कोंडला. काहींना खोकला येऊ लागला, तर काहींना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. काहींना धुरामुळे घशात जळजळ किंवा उलट्या झाल्याची माहिती समोर आली. या त्रासामुळे प्रेक्षक बाहेर जाण्यासाठी वाट शोधू लागले. माहिती मिळताच पोलिसांनी थिएटरमध्ये धाव घेतली. सध्या पोलिस थिएटरची तपासणी करत आहेत.
थिएटरमध्ये धूर नेमकं कुठून आला?
थिएटरमधील एका प्रेक्षकाने माहिती देताना सांगितलं, 'इंटरवलनंतर आम्हाला खोकला येऊ लागला. जवळपास १०-१५ मिनिटं गॅसचा वास येत होता. काहींना घशात जळजळ किंवा उलटीचा त्रास होऊ लागला. आम्ही थिएटरचे दार उघडले, मात्र तरीही गॅसचा वास कमी झाला नाही. १० मिनिटांनंतर चित्रपटाचं स्क्रिनिंग थांबवण्यात आलं.
पुष्पा २ या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. परंतू पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला गालबोट लागलं. प्रीमियरच्या दिवशी महिलेचा मृत्यू आणि आता थिएटरमध्ये धुराचे साम्राज्य. पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल केल्याचं बोललं जात आहे.
Post a Comment