माय नगर वेब टीम
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. खरं तर निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचाही पराभव झाला. यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही पराभव झाला. तेथून शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमोल खताळ निवडून आले. दरम्यान, आता बाळासाहेब थोरात यांच्याबाबत बोलताना भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका करत सूचक इशाराही दिला आहे. ‘मी तेव्हाच जाहीर सांगितलं होतं की पहिलं आमदार म्हणून निवडून या’, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.
राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
“विरोधी पक्षातील नेत्यांनी शपथ न घेणं म्हणजे संविधानाचा अपमान आहे. विरोधकांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. खरं म्हणजे राज्यातील त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा विरोधकांनी अपमान केला आहे. ज्यांना आमदारकीची शपथ घ्यायची नाही त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. आता ईव्हीएमबाबत शरद पवारांनी शंका उपस्थित केली. मला त्यांना विचारायचंय की जेव्हा सुप्रिया सुळे निवडून आल्या, तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नव्हता का? आता आत्मपरीक्षण करा आणि घरी बसा, थोडी विश्रांती घ्या”, असा खोचक सल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना दिला.
बाळासाहेब थारातांवर टीका
“अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात काहीजण प्रस्थापित होते. त्यांच्या मतदारसंघात अनेकवर्ष काम करत असताना सर्वसामान्य माणसांचं त्यांनी शोषण केलं. त्यांनी लोकांची आडवणूक केली. त्यामुळे केव्हातरी उद्रेक व्हायला पाहिजे होता तो झाला. नगर जिल्ह्यात एक परिवर्त झालं. हे परिवर्त फक्त सुरुवात आहे, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारचं चित्र दिसेल. जेव्हा बाळासाहेब थोरातांचे त्यांच्या मतदारसंघात भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावले होते, तेव्हाच मी जाहीर सांगितलं होतं की पहिलं आमदार म्हणून निवडून या. आता त्या ठिकाणी जनतेनं आमोल खताळ यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला”, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थारातांवर टीका केली. ते साम टिव्ही या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
भाजपा नवीन चेहऱ्यांना संधी देणार का?
पुढील काही दिवसांत महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्या मंत्रिमंडळामध्ये आता निवडून आलेल्या भाजपातील काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल का? असं विचारलं असता यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं की, “नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. तसेच देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य तो निर्णय घेतील. पण नक्कीच चांगल्या लोकांना संधी मिळेल”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.
Post a Comment