आरोग्यवर्धिनी केंद्रांचीही तपासणी करून घेतला आढावा
नागरिकांना सुरळीत सेवा मिळेल यादृष्टीने आरोग्य केंद्रात व जन्म मृत्यू विभागात उपाययोजना कराव्यात; आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेश
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये, नव्याने करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये व जन्म मृत्यू विभागात नागरिकांना आवश्यक सेवा व सुविधा सुरळीतपणे उपलब्ध राहतील, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले होते. त्यानुसार प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी कार्यभार स्वीकारताच आरोग्यवर्धिनी केंद्रासह जन्म व मृत्यू विभागात भेटी देऊन आढावा घेतला.
आयुक्त यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार डॉ. राजूरकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शासनाकडून आरोग्य विभागाच्या कामांचे, सेवांचे मूल्यमापन करून रँकिंग दिले जाते. यात महानगरपालिकेचा शेवटच्या पाच महानगरपालिकेत समावेश झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामात व सेवांमध्ये सुधारणा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी डॉ. राजूरकर यांना दिले आहेत.
त्यानुसार डॉ. सतीश राजूरकर यांनी कार्यभार स्वीकारताच आरोग्य केंद्रे, आरोग्यवर्धिनी केंद्रे व जन्म व मृत्यू विभागात भेटी देऊन झडती घेतली. नागरिकांना वेळेत दाखले देता येतील, अशा पद्धतीने कामाचे नियोजन करावे. दाखल्यांसाठी नागरीकांना वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना वेळेत दाखले मिळावेत, यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सुरळीत कामकाज राहील, असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शहरात १८ आरोग्यवर्धीनी केंद्र मंजूर असून त्यातील १२ कार्यरत करण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये डॉक्टर व इतर कर्मचारी वेळेत उपस्थित असावेत. आवश्यक औषध साठा व इतर आवश्यक सामग्री उपलब्ध ठेवावी. नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा दिली जाईल, यादृष्टीने उपाययोजना करून कामकाज करावे, असे डॉ. राजूरकर यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. राजूरकर यांनी आरोग्य केंद्रात व जन्म मृत्यू विभागात कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणींचीही माहिती घेतली.
Post a Comment