थकबाकीमुळे सात मालमत्ताधारकांवर कारवाई; पाच घरांना महानगरपालिकेने ठोकले सील, दोघांचे नळ कनेक्शन तोडले



थकबाकीदारांनी शास्तीमाफीचा लाभ घेऊन तत्काळ कर भरावा व कारवाई टाळावी : आयुक्त यशवंत डांगे 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर - मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत १०० % सवलत दिली आहे. तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे. गेल्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने आठ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात पाच जणांच्या घरांना, खोल्यांना सील ठोकण्यात आले आहे. तर, तिघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी बंद करण्यात आले आहे. मालमत्ता धारकांनी शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा व कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.


सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने अरुण रणमले यांच्याकडे असलेल्या १ लाख ६५ हजार ४५४ रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचे घर सील केले आहे.  एकनाथ सौदाणे यांच्या १ लाख १३ हजार १७६ रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. मालमत्ताधारक अरुण काशिनाथ शिरसाठ यांच्याकडे मालमत्ताकाराची ९९ हजार १७७ रुपये थकबाकी असल्याने त्यांची मालमत्ता सील करण्यात आली. मालमत्ताधारक विजय राजाराम जोशी यांच्याकडे मालमत्ताकराची १ लाख ५० हजार ७०६ रुपये थकबाकी असल्याने त्यांची मालमत्ताही सील करण्यात आली. तसेच मालमत्ताधारक आर. एम. उतेकर यांच्याकडे मालमत्ताकराची १ लाख ४० हजार १२० रुपये थकबाकी असल्याने त्यांची एक खोली सील करण्यात आली.


मालमत्ताधारक शेख मेहबूब अब्बास भाई यांच्याकडे मालमत्ताकराची १ लाख ६७ हजार ८७८ रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. मालमत्ताधारक श्रीमती सुभद्रा प्रभाकर नेटके यांच्याकडे मालमत्ता कराची १ लाख ६९ हजार ७३४ रुपये थकबाकी असल्याने त्यांची एक रूम सील करण्यात आली. प्रभाग अधिकारी बबनराव काळे, कर निरीक्षक ऋषिकेश लखापती, वसुली लिपिक संजय तायडे, संदीप कोलते, सागर जाधव, राजेश आनंद, मंजाबापू लहारे, किशोर देठे, गोरख ठुबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post