धक्कादायक! पत्नीने प्रियकर आणि भावाच्या मदतीने केला पतीचा खून



 गुन्हे शाखेने प्रकरणाचा उलगडा केला

मिरजगावजवळ अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा रहस्यभेद

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी कर्जत तालुक्यातील रवळगाव शिवारातील एका शेतात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला. साधारणतः 35-40 वयाच्या या व्यक्तीला गळफास देऊन, त्याच्या डोक्यावर दगड घालून चेहरा विद्रूप केला गेला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जमिनीत पुरण्यात आला होता. मिरजगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्ह्याची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपास पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी करून साक्षीदारांचा जबाब, तांत्रिक विश्लेषण, आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला.

गुन्ह्याचा उलगडा:
21 जानेवारी 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हा खून संतोष शिवाजी काळे (वय 44, रा. पळसदेव, इंदापूर, पुणे) याने आपल्या साथीदारांसोबत केला असल्याचे समजले. तपासादरम्यान संतोष काळे याला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये त्याने कबूल केले की, मृत दत्तात्रय राठोड (रा. जमशेदपूर, डिग्रस, यवतमाळ) हा त्याच्या पत्नी ललिता राठोडच्या अवैध संबंधांचा अडसर ठरत होता.

दोन वर्षांपासून संतोष आणि ललिता यांचे प्रेमसंबंध सुरू होते. मात्र, तिचा पती दत्तात्रय याला या गोष्टीची जाणीव झाली. तो सतत तिच्यावर संशय घेत असल्याने तिला मारहाण करत होता.

08 जानेवारी 2025 रोजी रात्री ललिता आणि संतोष यांच्यातील वादात दत्तात्रयने हस्तक्षेप केला. त्यानंतर संतोष, ललिता, आणि तिचा भाऊ प्रविण जाधव यांनी मिळून दत्तात्रयची हत्या केली. 09 जानेवारी रोजी मृतदेह कारने मिरजगावजवळील शेतात नेऊन पुरण्यात आला.

पुढील तपास:
प्रविण जाधव (वय 33, रा. सिंगर, डिग्रस, यवतमाळ) आणि ललिता राठोड (वय 25) यांना यवतमाळ येथे शोधून ताब्यात घेण्यात आले. तिन्ही आरोपींना मिरजगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post