नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर न करता मकरसंक्रांतीचा उत्सव उत्साहात साजरा करावा
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाच्या वाहतूक, विक्री, साठवणूक व वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यानुसार अहिल्यानगर शहरात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करणाऱ्यांसह नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील तमाम मांजा व पतंगाचे व्यवसाय करणारे, साठवणूक करणारे व्यापारी, आस्थापना व व्यक्ती यांना महानगरपालिकेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ५ अन्वये पक्षी व मनुष्यास इजा करणाऱ्या नायलॉन मांजाच्या वाहतूक, विक्री, साठवणूक व वापरास प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. नायलॉन मांजा विक्री, साठवणूक व वापरणे याबाबत दोषी आढळल्यास दंडात्मक तथा फौजदारी कारवाईची तरतूद असून अहिल्यानगर मनपा हद्दीत नायलॉन मांजाच्या वाहतूक, विक्री, साठवणूक व वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास दोषींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षी व नागरीकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या मांजाच्या वापरामुळे जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही. त्यामुळे शहरातील पतंग प्रेमींनी नायलॉन मांजाचा वापर करू नये. पतंग व मांजा विक्रेत्यांनीही नायलॉन मांजाची विक्री करू नये, मकरसंक्रांतीचा उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
Post a Comment