जल जीवनच्या कामातील भ्रष्टाचाराचाही पुनरूच्चार
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हे शापित असल्याचे सरकारमधील मंत्रीच सांगत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.
यासंदर्भात मंगळवारी खा. नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे माझे मत नाही तर महायुती सरकारमधील एका बडया मंत्र्याचे आहे. दरम्यान, खा. लंके यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे हा बडा मंत्री कोण याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.
महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर प्रदीर्घ कालखंडानंतर गेल्या शनिवारी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. विशेषतः नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपाचे नेते गिरीष महाजन यांच्याकडे तर रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदीती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आली. या दोन्ही जिल्हयातील पालकमंत्री पदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हवी होती. नाशिकमध्ये दादा भुसे तर रायगडला भरतशेठ गोगावले यांनी या पदांवर हक्क सांगितला होता. नाशिक तसेच रायगडचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे संतापून सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी निघून गेले. शिंदे यांच्या संतापानंतर दोन्ही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. या पार्श्वभुमीवर खा. नीलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली.
ईव्हीएमच्या जोरावरचे सरकार टिकत नसते !
महायुतीमधील एका बडया मंत्रयाने पत्रकारांशी खाजगीत बोलताना राज्यातील देवेंद्र सरकार शापित असल्याचे विधान केले आहे. ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेल्या लोकांना पाडण्याचे व पडलेल्या लोकांना निवडून आणण्याचे काम करण्यात आले आहे. ईव्हीएमच्या जोरावर सत्तेवर आलेले सरकार कधीही टिकत नसते.
खासदार नीलेश लंके
मुंडेंना शरद पवार यांचा विरोध
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असले तरी महाविकास आघाडी मात्र एकसंघ राहणार असल्याचा विश्वास खा. लंके यांनी यावेळी व्यक्त केला. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास शरद पवार यांचा विरोध होता या जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचेही खा. लंके यांनी समर्थन केले. जितेंद्र आव्हाड हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानात तथ्य असेल अशी पुष्टीही खा. लंके यांनी यावेळी बोलताना जोडली.
जल जीवनमध्ये भ्रष्टाचार
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाणी योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खा. लंके यांनी पुनरूच्चार केला.यासंदर्भात आपण या खात्याचे मंत्री आर सी पाटील यांना निवेदन देऊन भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले आहे. माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी ही योजना केवळ कागदावरच आहे. विशेषतः ज्या ठिकाणी या योजनेचे काम केवळ ६० टक्के पुर्ण झाले आहे तिथे ते ९० टक्के झाल्याचे भासविण्यात आले आहे. तसे व्हिडीओ आपल्याकडे आहेत. या योजनेची कामे देताना क्षमता नसतानाही ठेकेदारांना ही कामे देण्यात आल्याचे लंके यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Post a Comment