आढावा बैठक संपन्न
अहिल्यानगर : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा विकासाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्य शासनाचा १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या विकासाचे उपक्रमही वेगाने राबवावे आणि त्यासाठी कृती आराखडा तयार करा, असे निर्देश श्री.विखे पाटील यांनी यावेळी दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी होते.
पालकमंत्री म्हणाले, राज्यस्तरावर १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे. या धर्तीवर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करून विकासकामांना गती देण्यात यावी. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे गोदावरी घाट विकासाची कामे करण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टी प्रकल्प आणि अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा प्रस्ताव सादर करावा. साहसी पर्यटनाच्यादृष्टीने चंदनपुरी घाटाचा विचार करावा. भंडारदरा येथे स्कुबा डायव्हींगची शक्यता तपासून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात यावा.
जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने विकासाचे व्हिजन तयार करावे आणि त्यासाठी आवश्यक कृती आराखडा तयार करावा. १५ फेब्रुवारीपर्यंत याबाबत सादरीकरण तयार करावे. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी कामे करा, नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने लक्ष द्या. सुपे येथील अतिक्रमण काढण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
Post a Comment