माय नगर वेब टीम
बीड - महायुतीमधील सर्व वरीष्ठ नेत्यांशी मी संपर्कात आहे. त्यामुळे खालचे कार्यकर्ते काय बोलतात, त्यावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. आमच्या सरकारला इतरांनी कोणीही सल्ला देऊ नये. महायुती सरकारमध्ये नैतिकता आहे.
परंतु, निर्दोष व्यक्तीवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई व्हायला नको, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर स्पष्ट नकार देत चर्चेवर पडदा टाकला.
बीड हत्या प्रकरणात कुणाचा संबंध असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई करू. या संदर्भात चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले.
सध्या माध्यमांतून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणीची चर्चा सुरु आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही माझ्याकडे काही कागदपत्रे दिली आहेत. त्यात तथ्य आढळल्यास कारवाई नक्की करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
भारतीय जनता पक्षाच्या ज्यांना मी नेते समजतो, त्या सर्वांशी माझी चर्चा झाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. खालच्या पातळीवर पक्षाचे कार्यकर्ते काय बोलतात, याला उत्तर देण्यास मी बांधील नाही.
मात्र वरिष्ठ पातळीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जेपी नड्डा यांच्याशी माझी वारंवार चर्चा होत असते. आजही मुख्यमंत्र्यांशी याबाबत माझी चर्चा झाली असल्याचे पवारांनी सांगितले.
Post a Comment