धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली स्पष्ठ भूमिका

 


माय नगर वेब टीम

मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाप्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. या हत्याकांडात त्यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत सव्वा तास झालेल्या चर्चेनंतर जोपर्यत धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावा मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करा अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. सुमारे सव्वा तास मुंडेंनी अजित पवारांशी चर्चा केली आणि बीडची स्थिती समोर ठेवली. त्यानंतर आता अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी भूमिका घेतली असल्याची माहिती आहे.


तीनही तपासांमध्ये दोषी आढळल्यास कारवाई?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे. या तीनही चौकशीमध्ये जर धनंजय मुंडे हे दोषी सापडले तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे.


छगन भुजबळ यांनी केली धनंजय मुंडे यांची पाठराखण –

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणी पूर्णतः अयोग्य असल्याचे भुजबळ म्हणाले. मला मंत्री व्हायचे आहे, म्हणून कुणाचा बळी द्यावा, असे माझ्या मनातही येणे शक्य नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच संतोष देशमुख हत्याकांडावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे या घटनेचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागितला जात आहे? असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.


राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हस्तक्षेप करणार-

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हस्तक्षेप करणार आहेत. या संदर्भात सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले होते. यावर राज्यपालांनी आपण यासंदर्भात हस्तक्षेप करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


बीड जिल्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, यासह आपल्या विविध मागण्यासाठी सर्वपक्ष मंडळाने राज्यपाल यांची भेट घेतली. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात हे शिष्टमद्धे राज्यपालांना भेटले. या शिष्टमंडळने आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील या संदर्भात हस्तक्षेप करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


निवेदनातील प्रमुख चार मागण्या –

-या प्रकरणाशी संबंध आणि या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा.

-“कायद्याचे राज्य” ही भावना दृढ झाली पाहिजे. त्यासाठी अपहरण, खंडणी व खुन प्रकरणाचा सुत्रधार वाल्मिक कराड याच्याविरुध्द बीएनएस 103 (जुना आयपीसी 302) अन्वये तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करुन खटला Under Trial चालवावा.

-कायद्याची अंमलबजावणी कारणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करा. त्यांच्या कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.

-जनतेचा विश्वास पुनर्संचयित करा : बीडमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करुन, खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post