माय नगर वेब टीम
शिर्डी - ग्रीन एन क्लिन शिर्डी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविकांनी उपस्थिती दर्शविली.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते महापरिक्रमेची विधिवत उद्घोषणा करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी महापरिक्रमेच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमादरम्यान भजनांच्या सुरेल तालावर तयार झालेल्या आनंदमय वातावरणात मान्यवर आणि ग्रामस्थांसमवेत सहभाग घेत पाहुली या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला व सोहळ्याची रंगत वाढविली.
शिर्डी महापरिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे गव्हाच्या पिकांची पाहणी आणि चित्रीकरण करणे. त्यामुळे सोहळ्यास उपस्थित सर्वांनी शिर्डी परिक्रमेच्या निमित्ताने शेतांमधील गव्हाच्या पिकांची पाहणी केली. तसेच परिक्रमेदरम्यानच्या दृश्यांचे चित्रीकरण देखील करण्यात आले. त्याद्वारे या अनोख्या परंपरेचा अनुभव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
या सोहळ्याला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिरीष वमने (उपविभागीय पोलीस अधिकारी), महंत काशिकानंदजी सरस्वती महाराज, ग्रीन एन क्लीन शिर्डीचे अजित पारख, तसेच अभयभैय्या शेळके, गोपीनाथ बापू गोंदकर, विजयराव जगताप, दिगंबर कोते, ॲड. अनिल शेजवळ, गणेश कोते, डॉ. जितेंद्र शेळके, नितिन शेळके, प्रताप जगताप यांसारख्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
यावेळी डॉ. सुजय विखे यांनी शिर्डी महापरिक्रमा हा उपक्रम केवळ धार्मिक सोहळा नसून, तो सामाजिक एकात्मता आणि निसर्गप्रेमाचा संदेश देणारा सोहळा आहे, असे स्पष्ट केले. तसेच सर्व उपस्थितांनी शिर्डी महापरिक्रमेला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या संकल्पाने सदरील कार्यक्रमाची सांगता केली.
Post a Comment