माय नगर वेब टीम
आदर्शगाव हिवरेबाजार या ठिकाणी पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रेरक पुढाकाराने दि. 4 ते 10 जानेवारी 2025 या सात दिवसाच्या कालावधीत 'जीवन विद्या परिचय शिबीर' संपन्न होत आहे. गेल्या वीस वर्षापासून अत्यंत निःस्वार्थपणे जीवन विद्येच्या प्रसारासाठी अव्याहतपणे परिश्रम करणारे योगेश भैया व सुवर्णा ताई या शिबिराचे मुख्य प्रस्तुतकर्ता आहेत.
हिवरे बाजार या गावाने आपली ओळख केवळ राष्ट्रीय पातळीवर आदर्श ग्राम म्हणूनच निर्माण केली नाही तर इतर गावांसाठी प्रेरणा स्रोत म्हणून हे गाव गेल्या 25 वर्षांपासून दिपस्तंभप्रमाणे उभे आहे. स्वच्छ, सुंदर व वनराईने प्रयत्नपूर्वक नटवलेले हे गाव आज भौतिक समृद्धीने सुद्धा परिपूर्ण असल्याचे दिसते. खरंतर अशा आदर्श गावाला कुठल्या शिबिराची गरज का भासावी? हा महत्वाचा प्रश्न आहे.
योगेश भैया यांची पोपट पवार यांचे सोबत झालेल्या वैचारिक घुसळणीमध्ये या प्रश्नाचे जे उत्तर समोर आले आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. शेती आधारीत ग्रामीण जीवन सुद्धा आर्थिक समृद्धीने आणि खऱ्या श्रीमंतीने जगता येऊ शकते हे हिवरेबाजार या गावाने दाखवून दिले आहे. याकरिता ग्रामस्थांमध्ये जे वैचारिक एकमत आहे ते अत्यंत आवश्यक आहे. पदमश्री पोपटराव पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये या गोष्टी सहज होतांना दिसतात. अशा व्यक्ती प्रत्येक कुटुंबात तयार व्हावेत आणि असे स्वयंपूर्ण कुटुंब मिळून एक स्वयंपूर्ण गाव तयार व्हावे. प्रत्येक ग्रामस्थ स्वतःच्या प्रेरणेने विकासात सहभागी असेल आणि आपल्या देशाला आदर्श ग्रामस्थांची आणि आदर्श गावाची परंपरा आणि पर्यायाने सांस्कृतिक वारसा उपलब्ध होईल. यासाठी जे वैश्विक मानवीय सिद्धांत काम करतात ते मध्यस्थ दर्शन या तत्वज्ञानात स्पष्ट केले आहे.
मानव जातीच्या उज्वल भविष्याचा विचार करून एक व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या सगळ्यामधील एकसूत्रता ओळखून दृष्टी विकसनाची प्रक्रिया प्रस्तुत करण्याचा प्रस्ताव जीवन विद्येच्या माध्यमातून श्री ए. नागराज यांनी समस्त मानव जातीसाठी प्रशस्त असा जागृतीपथ 'मध्यस्थ दर्शनाच्या' रूपाने निर्माण केला आहे. केवळ दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमधील शिक्षण व्यवस्थेनेच जीवनविद्येचा विकल्प स्वीकारला नसून नेपाळ व भूतान यासारख्या देशांनी सुद्धा हा विकल्प स्वीकारलेला आहे.
हिवरेबाजार येथील समस्त ग्रामस्थ तथा यशवंत ग्राम कृषी व पाणलोट विकास संस्था, हिवरे बाजार, यांच्या पुढाकाराने दिव्यपथ संस्थान, अमरकंटक, मध्य प्रदेश, सौरभ शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था बुलडाणा, यांच्या सहयोगाने जीवनविद्या परिचय शिबिर हिवरेबाजार या ठिकाणी संपन्न होत आहे. या शिबिराची विषय वस्तू आपण सुद्धा समजून घ्यावी म्हणजे आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे कदाचित यात दडलेली असू शकतील.
Post a Comment