माय नगर वेब टीम
प्रयागराज - Stampede in MahaKumbh Prayagraj : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ६० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानाआधीच प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. तर ६० भाविक जखमी झाले. मृतांपैकी २५ जणांची ओळख पटलेली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची अधिकृत आकडेवारी घटनेनंतर जवळपास २० तासांनी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. डीआयजी वैभव कृष्ण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यावेळी त्यांनी घटनेचं कारणही सांगितलं.
दुर्घटनेतील ३० मृतांपैकी २५ जणांची ओळख पटलेली आहे. तर जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ३६ जणांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत.
अनेक कुटुंबांतील एकापेक्षा अधिक सदस्य या दुर्घटनेत मृत्युमुखी पावले आहेत. प्रचंड गर्दीच्या रेट्यामुळं बॅरिकेड्स तुटल्या. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात भाविकांचा मृत्यू झाला, असेही डीआयजी वैभव कृष्ण यांनी सांगितले.
आखाडा मार्गावर मध्यरात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती. झुंसी परिसरात बॅरिकेड्स तुटले. संगमाच्या दिशेने निघालेल्या गर्दीत स्नानाच्या प्रतीक्षेत थांबलेले अनेक भाविक सापडले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पाठिमागून प्रचंड गर्दीचा रेटा आला अन्...
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर जवळपास २० तासांनी प्रशासनानं मृतांची अधिकृत संख्या प्रशासनानं जाहीर केली. त्याचवेळी चेंगराचेंगरीचं कारणही सांगितलं. महाकुंभ डीआयजी वैभव कृष्ण यांनी ही घटना कशी घडली याची माहिती दिली. भाविक ब्रह्म मुहूर्ताच्या प्रतीक्षेत होते. त्याचवेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले. पाठिमागून गर्दीचा रेटा वाढल्याने अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. २९ तारखेला कोणतीही व्हीव्हीआयपी मुव्हमेंट नव्हती. यापुढील स्नानपर्वासाठीही कोणतीही व्हीव्हीआयपी मुव्हमेंट नसेल, असेही वैभव कृष्ण यांनी स्पष्ट केले.
Post a Comment