माय नगर वेब टीम
Manikrao Kokate On Ladki Bahin Yojana : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मात्र, यातही अद्याप काही महिलांना डिसेंबरचा हप्ता जमा झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता निकष लावण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे.
धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला निकषाची कात्री लागणार असल्याचं बोललं जात आहे. यातच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार की नाही? याबाबत आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलं आहे. “लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा? हे महिलांनी ठरवावं”, असं विधान लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. ते आज (४ जानेवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
नमो शेतकरी महासन्मान योजना आणि लाडकी बहीण योजना असा कोणता लाभ घेता येईल किंवा दोन्ही योजनेचा लाभ घेता येईल का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कृषीमंत्री कोकाटे यांनी म्हटलं की, “एका वेळी दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. हा नियम आहे. त्यामुळे महिलांनी हा निर्णय घ्यायचा आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा? हे त्यांनी ठरवायचं आहे”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
‘दोन्ही पैकी एकाच योजनेत सहभाग नोंदवा’
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला घेत असतील तर शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे वजा होतील, असा काही निर्णय झालेला आहे का? असं विचारलं असता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “असा निर्णय झालेला नाही. मात्र, दोन्ही पैकी एका योजनेत महिलांनी सहभाग नोंदवावा”, असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं. कोकाटे पुढे म्हणाले, “सरकारच्या योजनेत एका माणसाला दोन योजनांचा फायदा घेता येतो का? नाही घेता येत. एक शेतकरी एकाच जमीनीवर दोन बँकेकडून कर्ज घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम या ठिकाणीही लागू होतील. योजना वेगळ्या असल्या तरीही. अन्यथा दोन योजनांचा लाभ महिला घेऊ शकतील असा जीआर सरकारला काढावा लागेल”, असंही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
Post a Comment