माय नगर वेब टीम
बीड –बीड परळी मतदारसंघात 2021 ते 2024 या काळात तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काही काम न करता बोगस बिल सादर करत तब्बल 73 कोटी 36 लाख रुपये उचलत भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
दरम्यान, 30 जानेवारी रोजी बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येलाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बोगस बिले उचलल्याचा आरोप केला. तसेच आपल्याकडे असलेली कागदपत्रे अजित पवारांना देणार असून याबाबत तक्रार करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.
बीड जिल्ह्याचे जिल्हा नियोजनचे बजेट 400 कोटींचे आहे. त्यातील 90 टक्के पैसे परळीला घेऊन जायचे आणि 10 टक्के जिल्ह्यातील इतर भागाला द्यायचे. लाखो मतांनी ते (धनंजय मुंडे) निवडून नाही यायचे तर काय होणार? असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘नायक’ चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तसा संजय मुंडे हा अधिकारी एक दिवसासाठी कार्यकारी अभियंता होतोय. कुणाची शेळी कुणाला पिते हेच कळेना. दरम्यान अजित पवारांच्या 10-15 पीए यांना याबाबत माहिती देणार असल्याचे ही सुरेश धस म्हणाले.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, अर्थसंकल्पीय कामे हॅम अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले 59 कोटी रुपयांचे रस्त्याचे काम सुरू असून त्यामध्येच 6 कोटी 30 लाख रुपयांचे आणखी एक काम मंजूर करून आणले आणि केल्याचे दाखवले. परळी, पुस, बर्दापूर या रस्त्याचे काम न करता 5 कोटी रुपये बिल उचलले आहे. या कामाची पाहणी केली, तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगितले की 17 मार्च 2022 ला कक्ष अधिकाऱ्यांनी, बांधकाम विभागाने कळवले की, या कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे, तरी सुद्धा यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. यावेळी शिवशंकर स्वामी कार्यकारी अभियंता, संजय मुंडे उप अभियंता आणि अतुल मुंडे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते.
Post a Comment