अवैध धंदे रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश / एसपींच्या भूमिकेकडे लक्ष
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - नगर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोकेवर काढले असल्याचे भयान वास्तव आहे. त्यातच अवैध धंद्यांना आळा घालण्यात पोलिस प्रशासनही अपयशी ठरल्याने खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकतीच खंत व्यक्त केलीय. तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढलेत. असे असले तरी नगर तालुक्यातील नगर दौंड रोडवरील 'कर्डिलें'चा आणि नगर सोलापूर रोडवरील 'गोरें'चा 'नाजूक' व्यवसाय मात्र खुलेआम सुरु असल्याचे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
नगर तालुक्यात सध्या अवैध दारू विक्री, जुगार, मटका, लॉटरी, व्हिडीओ पार्लर, अवैध गुटखा, अवैध शस्त्र, हुक्का पार्लर, अंमलीपदार्थ, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध वाळू वाहतूक, गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगर-दौंड महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला कर्डिंलेचा 'नाजूक' व्यवसाय अनेक तक्रारी होवूनही खुलेआम सुरु आहे. तसेच नगर-सोलापूर रोडवरील 'गोरें'चा 'नाजूक' व्यवसाय बिनधास्तपणे सुरु असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस विभागाकडून केलेली कामगिरी प्रशंसेस पात्र नसल्यामुळे जिल्हा पोलिस दलाची प्रमिमा मलिन होत चालली असल्याची खंत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्यांच्या कारभाऱ्यांना दिले आहेत. असे असूनही नगर तालुक्यातील अवैध धंदे बंद होतांना दिसत नाही. त्यामुळे खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकानेच नगर-दौंड रोड व नगर-सोलापूर रोडवरील 'तो' व्यवसाय बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आदेश काढूनही अवैध धंद्यांना आळा न घातल्याने तालुक्याच्या कारभाऱ्यांबद्दल पोलिस अधीक्षक कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Post a Comment