माय नगर वेब टीम
पारनेर - नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर-नगर मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरात २१ हजार १९४ रूग्णांची तपासणी करण्यात येऊन १८ हजार ४८१ रूग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. २ हजार ६४९ रूग्णांचे मोतीबिंदूचे निदान झाले असून दररोज ३० रूग्णांवर पुण्यात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
खासदार नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून दि. १२ डिसेंबरपासून मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पारनेर नगर मतदारसंघातील शिबिरांचा समारोप झाला.
दि.१२ डिसेंबर रोजी पारनेर येथे गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आल्यानंतर बाभुळवाडे व वडझिरे येथे मोफत नेत्रतपासणी शिबिरास प्रारंभ झाला. त्यानंतर जवळे, लोणीमावळा, निंबळक, अळकुटी, राळेगणथेरपाळ, वाडेगव्हाण, राळेगणसिध्दी, निघोज, कर्जुले हर्या, कान्हूरपठार, रांजणगांवमशिद, रूईछत्रपती, खडकवाडी, ढवळपुरी, नांदूरपठार, सावरगांव, पिंपळगांवरोठा, पुणेवाडी, पारनेर, मांडवेखुर्द, गोरेगांव, दैठणे गुंजाळ, टाकळीढोकेश्वर, सुपा, नेप्ती, काताळवेढा, पळसपुर, पळशी, देहरे, जातेगांव, चास, सारोळा कासार, अरणगांव, वाकोडी, शिंगवे नाईक, भाळवणी, अकोळनेर, देऊळगांव सिध्दी, कामरगांव, टाकळीखातगांव, नवनागापुर, पोखरी व वनकुटे येथे शिबिरे पार पडली. या गावांच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. प्रत्येक गावामधील शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. नेत्र तपासणीनंतर रूग्णांना तात्काळ चष्म्याचे मोफत वितरण करण्यात आले तर मोतीबिंदूचे निदान झालेल्या रूग्णांवर दररोज ३० याप्रमाणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
गरजू, वंचितांची सेवा करण्याचे भाग्य लाभले
लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे. जनतेच्या सेवेसाठी माझा प्रत्येक क्षण समर्पित आहे. आरोग्य सेवा असो किंवा इतर कोणतीही गरज, मी नेहमीच जनतेसोबत आहे. जनतेच्या प्रेमावर आणि विश्वासावर माझे कार्य उभे आहे. हे कार्य असेच सुरू राहणार आहे. मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून गरजू, वंचित रूग्णांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.
खासदार नीलेश लंके
लोकसभा मतदारसंघात शिबिरे
पारनेर-नगर मतदार संघात नेत्र तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर आता नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही शिबिरे घेण्यात येणार आहेत. पारनेर नंतर आता पाथर्डी-शेवगांव मतदारसंघात शिबिर घेण्यात येणार असून त्यानंतर श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, राहुरी व नगर शहरात ही शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment