नगरच्या बाजारपेठेत पे ॲण्ड पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करू नये



भाजप पदाधिकाऱ्यांसह व्यापारी वर्गाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन 

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिकेने शहर व उपनगरात वाहनांसाठी पे ॲण्ड पार्क धोरण राबविण्याचे ठरवले आहे. यासाठी विविध जागाही निश्चित करून दरपत्रकही तयार करण्यात आलेले आहे. मात्र सदर निर्णयाची शहरातील मुख्य बाजारपेठेत अंमलबजावणी केल्यास बाजारपेठेतील अर्थकारणावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे. आधीच व्यापारी, व्यावसायिक बाजारपेठेत काही बेकायदा अतिक्रमण करणाऱ्या  प्रवृत्तींना वैतागले आहेत. त्यात नवीन पे ॲण्ड पार्क धोरण बाजारपेठ उद्ध्वस्त करणारे ठरेल. त्यामुळे सदर निर्णय रद्द करण्याचे आदेश देऊन अतिक्रमणांबाबतही लवकर कार्यवाही करावी अशी मागणी  भाजप व वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देऊन केली आहे.


यावेळी वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे महावीर कांकरिया, भाजपचे सचिन पारखी,  प्रशांत मुथा, व्यापारी महासंघाचे ईश्वर बोरा, तेजस डहाळे, प्रतीक बोगावत, पवन इथानी, भैय्या भांडेकर, दीपक देहरेकर आदी उपस्थित होते.


निवेदनात म्हटले आहे की, कापडबाजार, दाळमंडई, आडतेबाजार, गंजबाजार, सराफबाजार, नवीपेठ , शहाजी रोड या परिसरात शहरासह जिल्ह्यातून ग्राहक खरेदीसाठी येत असतात. मुळातच या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या आहे. अतिक्रमणांची समस्या आहे.  आधीच ग्राहक बाजारपेठेत येताना त्रस्त असतात. त्यात आता वाहन लावण्यासाठी पैसे मोजायचे असा भुर्दंड ग्राहक सहन करणार नाहीत. त्याचा परिणाम बाजारपेठेतील व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांच्या व्यवसायावर होवू शकतो. आधीच अनेक व्यापारी, दुकानदारांनी उपनगरांमध्ये आपापली दुकाने स्थलांतरीत केली आहेत. मोठ मोठे शोरूम, मॉल्स सावेडी, केडगाव उपनगरांत उभे राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील ग्राहक आधीच कमी झालेला आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना शहरातील मुख्य बाजारपेठ जवळ पडत असल्याने ग्राहक येतात. पे ॲण्ड पार्कमुळे ग्राहकांना वाहन लावण्यासाठी तासाला पैसे द्यावे लागणार आहेत. यातून मोठा भुर्दंंड ग्राहकांच्या खिशाला बसेल. महापालिका प्रशासनाने व्यापारी वर्गाशी चर्चा करून असा महत्वाचा निर्णय घेणे अपेक्षित होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठ वाचविण्यासाठी मनपा प्रशासनाने निदान बाजारपेठेत तरी पे ॲण्ड पार्क धोरणाची अंमलबजावणी करू नये ही विनंती. अतिक्रमणाच्या गंभीर प्रश्नावरून व्यापारी वर्गाला दादागिरी, मारहाणीचे प्रकार घडतात. त्यालाही पायबंद बसवावा असे निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयाची तातडीने दखल घेत महानगरपालिकेसह संबंधितांना सूचना दिल्याचे महावीर कांकरिया यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post