ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी रोहित वाघची निवड



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (एसआयएमएमसी) च्या एमबीए प्रथम वर्षातील विद्यार्थी रोहित राजेंद्र वाघ याची निवड झाली आहे. रोहित 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. बालेवाडी शूटिंग रेंज येथे झालेल्या प्रादेशिक स्पर्धेत रोहितने चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळवले होते.


यापूर्वी, चेन्नई (तामिळनाडू) येथे आयोजित 33 व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग स्पर्धेत रोहितने 50 मीटर गटात कांस्यपदक पटकावले होते. आता तो नेशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) तर्फे दिल्लीतील डॉ. करणीसिंग शूटिंग रेंज येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सहभागी होणार आहे.


रोहितला एन. शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवराज ससे व सविता मताने यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे तो यशस्वी वाटचाल करत आहे.


सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षक व पालक यांनी रोहित वाघचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, "सूर्यदत्ता संस्थेमध्ये नेहमीच क्रीडा आणि फिटनेसला प्रोत्साहन दिले जाते."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post