वाल्मिक कराडवर मकोका, परळी बंदची हाक; सुरेश धस म्हणाले, आता…”

 


माय नगर वेब टीम

बीड - Beed Sarpanch Murder Case Update: वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यानंतर परळीत बंदची हाक देण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवरही मकोका दाखल करण्यात यावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. संतोष देशमुख यांचे कुटुंबियांनीही यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर आज वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला असून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यानंतर परळीत मात्र कराड समर्थक आक्रमक झाले असून परळी बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून २९ जानेवारी पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजले असून जमावबंदी लागू केली आहे.

मकोका दाखल केल्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणत्या गुन्ह्यात मकोका दाखल केला, याची मला माहिती नाही. पण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे सहभागी असतील त्यातील कुणालाच सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे इतर आता कुणाच्या मागण्यांना काही अर्थ नाही. एसआयटीने नियमाप्रमाणे कडी जोडलेली आहे.

धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही मकोका दाखल झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्या भावाच्या हत्येमधील जे जे आरोपी आहेत, त्या सर्वांना शिक्षा झाली पाहीजे. या गुन्ह्यात जे जे आरोपी आहेत, त्यांच्यावर ३०२ आणि मकोकाचा गुन्हा दाखल व्हावा. मुख्यमंत्री आणि एसआयटी योग्य दिशेने काम करत असून त्यावर आमचे समाधान आहे.

बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू

वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीतील त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच पोलिसांनी जमावबंदी लागू करत प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले आहेत. पाच किंवा अधिक माणसांनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी खासगी शस्त्र बाळगण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post