महानगरपालिकेची बाजारपेठेतील अतिक्रमणांवर मोठी कारवाई ; रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली

 


मोहीम सुरूच राहणार; अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावी : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर - महानगरपालिकेने मंगळवारी अचानक अतिक्रमण हटाव मोहीम राबवत बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवली. काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन केल्याची माहिती दिली होती. तसेच, व्यापाऱ्यांनीही अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, अशी मागणी सोमवारी केली होती. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असून, अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.


अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी भिंगारवाला चौक ते तेलीखुंट, पोखरणा ज्वेलर्स ते शहाजी रोड, सारडा गल्ली, मोहन ट्रंक डेपो, गंजबाजार या संपूर्ण परिसरातील रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवली. यात टपऱ्या, हातगाड्या, दुकानासमोरील फलक हटवण्यात आले. महानगरपालिकेने अचानक सुरू केलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांची धावपळ उडाली.


महानगरपालिकेने अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे. यापूर्वीही अतिक्रमणे काढून घेण्यासाठी पूर्वसूचना देण्यात आली होती. महानगरपालिकेने सुरू केलेली मोहीम आता थांबणार नसल्याचे स्पष्ट करतानाच अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करून अतिक्रमणे हटवण्यात येतील. जप्त केलेल्या हातगाड्या, टपऱ्या पुन्हा सोडून देण्यात येणार नाहीत, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post