माय नगर वेब टीम
जालना : संतोष देशमुख प्रकरणात महाराष्ट्र पिंजून काढत मुंडे बहीण-भावावर टीका करणारे सुरेश धस चर्चेत आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर सुरेश धस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतल्याचं समोर आलं आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे . शत्रूपेक्षा मोठा धोका दिल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, 'मला ऐकायला मिळालं आहे. मला यावर जास्त बोलता येणार नाही. मी माहिती घेणार आहे. मराठा समाजाने त्यांच्यावर खूप मोठा विश्वास दाखवलाय. परंतु राजकारणाच्या आहारी जाऊन समाजाशी दगाफटका करणे चुकीचे आहे. त्यांनी निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देणार नव्हते. बीडमध्ये समाजातील व्यक्तीची हत्या झाली. त्यात धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला कसे गेले, ही खूप शॉकिंग आहे. मला आजही वाटत नाही. मी अजून बघितलं नाही. मला वाटत नाही'.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, 'सुरेश धस कशासाठी गेले,याबाबत काही माहिती नाही. त्यांच्यावर खूप विश्वास टाकला होता. समाज खूप मानायला लागला होता. हा माणूस समाजासाठी लढायला लागला होता. समाजाने काही कमी पडू दिलं नाही. आम्ही निवडणुकीत खूप लीड दिली होती. ज्यांनी धसांचं तोंडही बघितलं नव्हतं. अशा जवळपास ३०० गावातील तरुणांनी त्यांच्यासाठी काम केलं होतं. इतक्या लवकर पळ काढतील. समाजाला संकटात सोडतील. मला कधीही वाटलं नव्हतं'.
'ही बाब खरं असेल, तर दुर्दैव आहे. वंजारी, ओबीसी समाज वेठीस धरण्यात आलं होतं. एका गुंडांची टोळी चालवणाऱ्याला भेटायला जाणे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे. मी मराठ्यांसाठी खंबीर आहे. राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी असतात. देवेंद्र फडणवीसांनाही एवढा धोका दिला नव्हता. शत्रूपेक्षा मोठा धोका दिला आहे, असा टोला जरांगे पाटील यांनी दिला आहे.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुंडे आणि धसांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय देशमुख म्हणाले, ' त्यांच्या भेटीवर सुरेश धस प्रतिक्रिया देतील. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उचित प्रतिक्रिया देता येईल. मी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे. केससंदर्भात तपास कुठपर्यंत आला आहे. भूमिका काय घ्यायची, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलो आहे'.
Post a Comment