नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा ; खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी

 


माय नगर वेब टीम

अहिल्यानगर :    नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरीकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी बुधवारी संसदेत केली.  

        या प्रश्नाकडे संसदेचे लक्ष वेधताना खा. लंके यांनी सांगितले की,अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ असून जिल्हयाची लोकसंख्या ५० लाखांहून अधिक आहे.असे असतानाही जिल्ह्यात एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच रूग्णांना इतर शहरांकडे धाव घ्यावी लागते. या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी खा. लंके यांनी संसदेत केली. 


     दरम्यान, या मागणीचे पत्र खा. नीलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांना दिले आहे. पंतप्रधानांसह इतर मंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे की, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्याची स्थिती मागासलेली आहे. गरीबांसाठी स्वस्त आणि सुलभ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी या जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे अत्यंत गरजेचे आहे.


      नगर दक्षिण मतदारसंघात ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये अद्यापही पुरेशा आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय रूग्णांना पुणे, औरंगाबाद किंवा मुंबई येेथे जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असल्याचे लंके यांनी निदर्शनास आणून दिले.  जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी एमबीबीएस आणि उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेरच्या राज्यात जाण्यासाठी मजबूर होता. कोविड- १९ महामारीच्या काळात जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा मोठा अभाव जाणवला. भविष्यात संभाव्य आरोग्य आपत्ती टाळण्यासाठी जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय आणि मल्टीस्पेशालिटी रूग्णालय उभारणे अनिवार्य असल्याचे खा. लंके यांनी म्हटले आहे. 

रोजगार आणि औद्योगिकरणाला चालना 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट यांना मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय मार्फा इंडस्ट्री, संशोधन केंद्रे आणि आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित अन्य उद्योगांना देखील चालना मिळेल असे खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे. 

मागणीला जिल्ह्यात पाठींबा 

प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत हे वैद्यकीय महाविद्यालय त्वरीत मंजुर  करण्यात यावे तसेच त्यासाठी लवकरात लवकर जागा निश्चित करून प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी अशी आग्रही मागणी खा. लंके यांनी केली आहे. या मागणीला अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठा पाठींबा मिळत असून सरकारने या मागणीवर त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post