कामगारांने घातला मालकाला पाच लाखाला गंडा



माय नगर वेब टीम

 अहिल्यानगर - शहरातील ए. एच. पोखर्णा ज्वेलर्स या सराफ दुकानातून 57.22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात करण अजय मिसाळ (रा. बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) या दुकानातील कामगारावर संशय घेतला जात असून, त्यानेच हे दागिने चोरल्याची कबुली तोफखाना पोलिसांसमोर दिली आहे. पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक पंकज अशोक कटारीया (वय 36, रा. सारसनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. 15 फेब्रुवारी 2025 रोजी स्टॉक तपासणी दरम्यान सोन्याचे काही दागिने दुकानातून गायब असल्याचे आढळून आले. सखोल चौकशीनंतर समोर आले की, 13 फेब्रुवारी रोजी करण मिसाळ हा अचानक दुकानातून काम सोडून गेला होता. त्यामुळे त्याच्यावर संशय घेतला गेला. फिर्यादीने त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी बुधवारी (12 मार्च) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी करण मिसाळ यास बोलावून चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याने चोरलेले दागिने शिवाजी पाटील नामक सराफाकडे मोडले असल्याची माहिती दिली.

चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत पाच लाख 30 हजार 831 रूपये असून यामध्ये झुबे, कानातली टॉप्स आदी दागिन्यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी करण मिसाळ याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष गर्जे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post