माय नगर वेब टीम
अहिल्यानगर– राज्यातील जुन्या वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार, १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या सर्व नवीन वाहनांसाठी एचएसआरपी पाटी बंधनकारक आहे. तसेच, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठीही ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठी शासनाने पूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र वाहनधारकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका नसल्याने ती वाढवून ३० जून २०२५ करण्यात आली आहे.
एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अर्ज मोटार वाहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://transport.maharashtra.gov.in) करता येईल. तसेच, वाहनधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी परिवहन विभागाने सहायता कक्ष सुरू केला आहे. विहित मुदतीत एचएसआरपी नंबरप्लेट बसवले नाही, तर नियमभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असेही श्री. सगरे यांनी कळविले आहे.
Post a Comment