केंद्र व राज्यातील उद्योग व कामगार मंत्र्यांचेही वेधले लक्ष
माय नगर वेब टीम
पारनेर : सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना प्रशासनास वेठीस धरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून नाहक त्रास देण्यात येत असल्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल, यांच्याकडे थेट तक्रार केली आहे.
राज्याचे उद्योग तसेच कामगार मंत्री यांचेही खा. लंके यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. खा. लंके यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे की, सुपा-पारनेर औद्योगिक वसाहत दिवसेंदिवस वाढत असून अनेक नवनविन उद्योग या वसाहतीमध्ये येत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योजकांना वारंवार नाहक त्रास दिला जात आहे. या त्रासामुळे या वसाहतीमध्ये नव्याने येणाऱ्या उद्योगांवर परिणाम होणार आहे. आणि हे असेच सुरू राहिले तर नव्याने निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींवर त्याचा गंभीर परिणाम होणार असल्याचे खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे.
खा. लंके आपल्या पत्रात पुढे म्हणतात, सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमधील स्थानिक कामगार कंत्राटदारांचे परवाणे कोणतेही ठोस करण न देता रद्द करण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले उद्योग तसेच नव्याने सुरू होत असलेल्या उद्योजकांना विनाकारण चुकीच्या नोटीस पाठविण्यात येऊन दबाव टाकण्यात येत आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही प्रकारचे गौण खनिज उत्खनन अनधिकृतपणे सुरू नसतानाही पालकमंत्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्योजकांवर चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्यासाठी करण्यास भाग पाडत आहेत. सदर उद्योजकांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात येउन धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप या पत्रामध्ये खा. लंके यांनी केला आहे.
उद्योग बंद होतील, बेरोजगारी वाढेल
सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये जर असेच प्रकार सुरू राहिले तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असलेल्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या या औद्योगिक वसाहतीमध्ये भविष्यात नविन उद्योग येणार नाहीत. किंवा आहेत ते उद्योग बंद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न अधिक तिव्र होईल. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून संबंधितांना योग्य ते आदेश देण्याची विनंती खा. लंके यांनी या पत्राद्वारे केली आहे.
Post a Comment