शहर अहिल्यानगर ठाकरे शिवसेनेच्या वतीने १००० श्रीराम स्तोत्र पुस्तिकांचे वाटप
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर: श्रीराम नवमी हा सण केवळ उत्सवच नाही, तर माणसाला आपल्या कर्तव्यातून आणि नीतीमत्तेतून जीवन कस जगाव हे शिकवतो. प्रभू श्रीरामांच जीवन हे संयम, शौर्य आणि प्रेमाच प्रतीक आहे. हा सण राम भक्तांना एकत्र आणतो आणि समाजात शांती, प्रेम आणि बंधुभाव वाढवतो, असे प्रतिपादन अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
श्रीराम नवमी निमित्त शहर अहिल्यानगर ठाकरे शिवसेनेच्या वतीने नागरिकांना १००० श्रीराम स्तोत्र पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. दिल्ली गेट येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रभू श्रीरामांच्या जय जयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अंबादास शिंदे, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, विलास उबाळे, शिवसैनिक विकेश गुंदेचा, सुनील भोसले, महावीर मुथा, किशोर कोतकर, गणेश आपरे, जयराम आखाडे, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, शंकर आव्हाड, योगेश भोरे, मंगेश कासार, साहिल गुंदेचा, दिनकर खेडकर, राजेंद्र तरटे, विजय शिंदे, दीपक काकडे आदींसह शिवसैनिक, श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे म्हणाले, सकल हिंदू समाजासाठी श्री राम नवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. रावणासारख्या दुष्ट शक्तींचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी प्रभू श्री राम यांचा जन्म झाला होता. श्री राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, जे नीतिमत्ता, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत.
काळे पुढे म्हणाले, राम जन्मोत्सव हा भक्तांसाठी आनंदाचा दिवस आहे. प्रभू श्रीराम हे भक्तांचे रक्षणकर्ता म्हणून पाठीशी उभे राहतात. अनेक भक्त नित्य नियमाने श्रीराम स्तोत्राचे पठण करत असतात. या माध्यमातून प्रभू श्रीरामांची स्तुती करत असतात. त्यामुळेच प्रभू श्रीराम भक्तांसाठी श्रीराम स्तोत्र पुस्तिकांचे वाटप करण्याचा उपक्रम शिवसेनेने राबविला आहे. हिंदुत्व शिवसेनेचा श्वास आहे.
भिंगारमध्ये देखील वाटप :
भिंगार शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवार बाजार येथील श्रीराम मंदिरामध्ये शहर प्रमुख किरण काळे यांच्या हस्ते श्री राम स्तोत्र पुस्तिकांचे राम भक्त भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना माथाडी विभागाचे जिल्हाप्रमुख अमोल सजलानी शिवसैनिक सुदर्शन गोहेर, लखन छजलानी, समाजभूषण राधेलाल नटवाल आदींसह शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post a Comment